कै. इंदिराबाई हळबे मावशींनी १९५४ साली स्थापन केलेल्या मातृमंदिर संस्थेने ग्रामीण विकासात आणखी एक यशस्वी पाऊल टाकत जून २००८ रोजी प्रा. मधु दंडवते कृषी तंत्र निकेतनाची स्थापना केली. येथे तीन वर्षाचा कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो. गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना शेती विषयक शास्त्रीय ज्ञान प्राप्त व्हावे. कृषी आधारित पूरक व्यवसाय व रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने संस्थेने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या मान्यतेने कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम सुरु केला.
कृषी शिक्षणात महत्त्वाकांक्षी पाऊल टाकतानाच अभ्यासक्रमास आवश्यक असणाऱ्या सुविधा व योग्य अर्हताप्राप्त शिक्षक व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यशेती, गांडूळखत निर्मिती, पशुपालन, कुक्कुटपालन, फुलझाडे व भाजीपाला लागवड, रोपवाटिका व्यवस्थापन, अळंबी संवर्धन, मातीपरीक्षण, हरितगृह तंत्रज्ञान यासारख्या कृषी पूरक उद्योगांचे शिक्षण विद्यार्थी तीन वर्षाच्या कालावधीमध्ये यशस्वीपणे घेत आहेत. तसेच एक आदर्श कृषी पदवीधारक विद्यार्थी घडविण्यासाठी विविध स्पर्धा आणि विविध विषयांमधील तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते.