कोंकण आणि संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. रुग्णांना हॅास्पिटलमध्ये बेड मिळत नाही त्यामुळे होणारी अस्वस्था आणि त्या धक्याने मृत होणारे रुग्ण या अत्यंत भयावह अशा परिस्थितीत मातृमंदिर देवरुख संस्थेने कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेत संगमेश्वरवासीयांना आरोग्यदायी आधार दिला आहे. मातृमंदिर संस्थेने येथील कोविड रुग्णांना संस्थेमार्फत मोफत जेवण सुरु केले असून आर्थिक दुर्बल घटकांसाठी ५ बेड राखीव ठेवले आहेत. गरीब रुग्णांसाठी सवलतीच्या दरात औषधोपचार होणार असल्याचे धोरण संस्थेने ठरविल्याचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेटये यांनी सांगितले .
शिमगोत्सव काळात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने फैलावला. काही घरे , वाड्याच करोनाग्रस्त झाल्या. वेळीच ॲाक्सीजन आणि उपचार न मिळाल्याने अनेक मान्यवर आणि तरुणांचे निधन झाले. संपूर्ण तालुक्यांत प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. आयुष्याच्या शाश्वतीचा विश्वासच उडाला. सा-या आरोग्य यंत्रणाच जणू कोसळून पडल्याच्या परिस्थितीत मातृमंदिरने कोविड सेंटर सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मातृमंदिरचे देवरुख येथे हॅास्पिटल जवळच गोकुळ बालगृह आहे (हॉस्पिटल परिसरात असलेल्या संस्थेच्या अन्य उपक्रमांमुळे) कोविड सेंटर सुरु करण्याबाबत अडचणी होत्या. मात्र संगमेश्वर तालुक्यांतील सर्व सामान्य जनतेची गरज लक्षात घेतां मावशी हळबे यांनी व्रतस्थ वृत्तीने सामाजिक कार्यासाठी सुरु केलेल्या संस्थेचे हे प्राधान्याने कर्तव्य असल्याचा निर्णय संचालकमंडळाने घेतला.
डॅा. परमेश्वर गोंड यांच्या एसएमएस हॅास्पिटलच्या सहकार्याने हे कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. मातृमंदिर हॅास्पिटलने यासाठी आवश्यक तज्ञ डॅाक्टर, भूलतज्ज्ञ, नर्सेस यांची टीम उभारली आहे. एकूण ३० बेडची उपलब्धता करण्यात आली असून अधिक १५-२० बेड वाढवावे लागल्यास त्याची उभारणी करण्यासाठी संस्था कार्यमग्न आहे. हॅास्पिटलमध्ये बेड मिळाला नाही म्हणून येथील एकही रुग्ण आरोग्य सुविधेपासून वंचितत राहता कामा नये या उद्देशाने संस्था कार्यरत आहे.
कोविड पेशंटकडून (पेशंटची २-४ लाखाची) लाखो रुपयांची बिले घेत त्यांची लूटमार होत असल्याच्या घटना रोज सोशल मिडीयावर वाचावयास मिळतात. मातृमंदिर रुग्णालयात हे घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. रुग्णांकडून शासनाने नेमून दिलेल्या दराप्रमाणे बिल आकारणी होईल . गरीब रुग्णांसाठी संस्थेने स्वखर्चाने ५ बेड राखून ठेवले आहेत. तेथे रुग्णाला पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार मिळतील.
कोविड रुग्णाला जेवणाचा डबा पाठविण्यासाठीही नातेवाईक संसर्ग होईल म्हणून घाबरतात याचा विचार करुन या सर्व रुग्णांची जेवणाची मोफत सुविधा मातृमंदिर संस्थेने केली आहे.
आज १९ रुग्ण येथे उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्यात १०-१२ रुग्ण उत्तम बरे होऊन घरी परतले आहेत. हॅास्पिटलने नुकतीच आयसीयू सुविधा उपलब्ध केली आहे. देवरुख येथील हे पहिलेच आयसीयू सुविधा असणारे हॅास्पिटल आहे. देवरुख सारख्या ग्रामीण भागात मातृमंदिरच्या या कोविड सेंटरने फार मोठा आधार दिला आहे.
या सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. संस्थेच्या या आवाहनाला प्रतिसाद चांगला मिळत आहे. मातृमंदिर संस्थेचे कोविड बुलेटिन संस्थेच्या वेबसाईटवर रोज अपडेट होणार आहे.